आयपी, अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
150 CCTV at Vitthal Mandir, pandharpur, vitthal Rukmini darshan, aashadhi wari, Vitthal Darshan,

पंढरपूर (ता.30):- 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतील घुसखोरी, तात्काळ आरोग्य व्यवस्था, अनुचित प्रकार घडू नये व इतर घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. याशिवाय, नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची खूप मोठी मदत होत आहे. याशिवाय, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेऱ्यांचा अक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण वेळ ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून, त्याची जबाबदारी विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांचेकडे आहे.

वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती, त्या त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आयपी, अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. या सर्व कॅमेराद्वारे चित्रित केलेला डाटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. संबधित कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करीत असल्याने कोणताही परिसर त्याच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार असून, आवश्यक ठिकाणी भाविकांना तात्काळ मदत देखील करता येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

**********************

हि सेवा विनामूल्य असली तरी आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटला ऐच्छिक देणगी देऊ शकता.

vitthaldarshan.com ही सेवा भाविकांसाठी विमुल्य आहे. परंतु ही सेवा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैश्याची गरज भासत असते. त्यामुळे भाविकांनी आपल्या इच्छेने देणगी द्यावी. जेणेकरून हि सेवा अखंड चालू ठेवता येईल.