नवीन

6/recent/ticker-posts

महाद्वारकाला पंढरपूरच्या यात्रेचा समारोप - पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-२१) - डॉ सचिन वसंतराव लादे

पंढरीची अक्षर वारी   (भाग-२१) महाद्वारकाला

mahadwar kala, haridas maharaj, history of pandharpur wari, part - 20, dr. sachin lade, vitthal, rukmini,  maharashtra, india, vitthaldarshan,

छत्रपती शिवाजी महाराज स्थापन करू पहात असलेल्या हिंदवी स्वराज्यावर सन १६५९ मध्ये अफझलखानाच्या रूपाने मोठे संकट आले. विजापूरचा पराक्रमी अफजलखान स्वारीवर निघाला व वाईला जाण्यापूर्वी त्याने वाटेत येणाऱ्या तीर्थक्षेत्रांचा- मंदिरांचा विध्वंस करायला सुरुवात केली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील त्याने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अफजलखानाचे पंढरपूरवर येणारे संकट लक्षात आल्यानंतर संत नामदेवांचे वंशज श्री केदारबुवा महाराज यांना आपल्या घरात असणाऱ्या श्री केशवदेवाच्या मूर्तीची काळजी वाटू लागली, ही मूर्ती सुरक्षित कोठे ठेवता येईल याचा विचार करीत असताना त्यांना श्री गोविंदबुवा हरिदास, श्री पांडुरंगबुवा हरिदास व त्यांचे वडील यांची आठवण झाली व त्यांनी आपल्या रोजच्या देवपूजेत असणारी श्री केशवदेवाची मूर्ती हरिदास यांचेकडे सोपविली. आजही ही मूर्ती हरिदास यांचेकडे आहे. पुढे श्री पांडुरंगबुवा हरिदास यांना सन १७२० च्या सुमारास श्री पांडुरंगाच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. एकीकडे नामदेव महाराजांच्या वंशजांकडून प्राप्त झालेली केशवदेवाची मूर्ती व दुसरीकडे श्री पांडुरंगाच्या पादुकांचा प्रसाद म्हणून झालेला लाभ, याचा विचार करून श्री पांडुरंगबुवा हरिदास यांनी सन १७२० मध्ये आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाद्वारामध्ये काला करण्याचा निर्णय घेतला व विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांनी महाद्वार काल्याची सुरवात केली. आजतागायत ही प्रथा हरिदास यांच्या घराण्यामध्ये पाळली जाते. महाद्वार काला हा पंढरपूरच्या यात्रा सोहळ्याचा सांगता समारंभ मानला जातो. जे भाविक पंढरपूरची वारी नित्यनेमाने करतात किंवा जे भाविक चातुर्मासामध्ये पंढरपूरात राहण्यासाठी आलेले असतात असे सर्व भाविक या महाद्वारकाल्याला उपस्थित राहतात व हा महाद्वार काला घेऊन पंढरपूरची आपली यात्रा संपन्न झाल्याचे समाधान मानतात. हा महाद्वारकाला पंढरपूरच्या यात्रेचा समारोप आहे व भूषणदेखील आहे.

सहज-सोप्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. या संप्रदायाने आजच्या आधुनिक काळातही संत विचारांचा जागर कायम सुरूच ठेवला आहे. संतांनी जी शिकवण मध्ययुगीन कालखंडामध्ये दिली, ती आजही, आजच्या परिस्थितीतही आपल्याला गरजेचीच आहे. येणाऱ्या नव्या पिढीला वारकरी संप्रदाय म्हणजे म्हातारपणी वेळ घालवण्यासाठी करावयाची गोष्ट असे दुर्दैवाने वाटते, परंतु संतांनी हिंदू धर्म, हिंदू संस्कृती याबाबत समाजमनाची मशागत करण्यासाठी आपल्या अभंगातून जे लिहून ठेवले आहे ते नव्या पिढीसमोर मांडण्याची खरोखरच गरज आहे, ही गरज आजच्या काळातही वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे अनेक महाराज आपल्या कीर्तन प्रवचनातून पूर्ण करत आहेत. आपण देखील याच परंपरेचा भाग बनून संतांचे विचार समजून घेतले पाहिजेत, हे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत व या विचारांचा प्रसार व प्रचार केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण या संतांचे वारसदार म्हणून पात्र ठरू.(समाप्त)

- डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

history of pandharpur wari, dr. sachin lade, vitthal, rukmini, vitthaldarshan,

Post a Comment

0 Comments