नवीन

6/recent/ticker-posts

श्री पांडुरंगाची रथयात्रा - पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-20) - डॉ सचिन वसंतराव लादे

पंढरीची अक्षर वारी   (भाग-20) श्री पांडुरंगाची रथयात्रा

pandurangachi rath yatra, history of pandharpur wari, part - 20, dr. sachin lade, vitthal, rukmini,  maharashtra, india, vitthaldarshan,

श्री.खासगीवाले यांनी पुढाकार घेऊन काढलेल्या रथयात्रेसाठी पेशव्यांनी मदत केली. पेशवे सरकार यांनी श्री खासगीवाले यांना या रथयात्रेसाठी पंढरपूर शहराजवळील कौठाळी गाव जात इनाम म्हणून व वाखरीची चौथाई दिली. त्यावेळेपासून कौठाळी या गावातील वडार समाज व बाराबलुतेदार व आष्टी या गावातील बलुतेदार यांना मानकरी म्हणून नेमले गेले, त्याच बरोबर बडवे, देवधर व नातू या घराण्यातील देखील मानकरी नेमले गेले. आजतागायत हेच मानकरी कायम आहेत. श्री खाजगीवाले यांनी स्वखर्चाने रथामध्ये बसविण्यासाठी एक फूट उंचीची श्री पांडुरंगाची चांदीची व वरून सोन्याचा मुलामा दिलेली मूर्ती तयार करून घेतली, ही मूर्ती आजही या रथामध्ये बसवून त्याची मिरवणूक काढली जाते. या मूर्तीच्या दोन्ही बाजूस भुदेवी व श्रीदेवी यांच्या पितळेच्या मूर्ती असतात. खाजगीवाले यांच्या मोठ्या रथाचा छोट्या रस्त्याने जाताना त्रास होऊ लागला व एक छोटासा अपघात सन१९४१ मध्ये घडला, त्यामुळे पुढच्या काळात रस्त्याच्या रुंदीचा विचार करून रथाची निर्मिती करण्याचे ठरले, परंतु खासगीवाले व मानकरी यांनी विरोध केला, त्यामुळे आजतागायत जुनाच रथ या यात्रेसाठी वापरला जात आहे. ही रथयात्रा पाहण्यासाठी व विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रदक्षिणेच्या रस्त्यावर दुतर्फा वारकरी व भाविक खूप गर्दी करतात. ही रथयात्रा वारीचा एक मुख्य कार्यक्रम असून पंढरपूरच्या वारीचे खऱ्या अर्थाने भूषण आहे.

भगवान श्रीकृष्णांना गोपाळकृष्ण म्हणूनही ओळखले जाते, गोपाळकृष्ण व त्यांचे सवंगडी जेव्हा गुरांमागे गुरे राखण्यासाठी रानावनात जात, त्यावेळी गुरे राखता -राखता दुपारच्या वेळी सर्व गोपाळांच्या शिदोर्‍या एकत्र करून- एकत्र मिसळून सर्वजण त्या अन्नाचा सुखाने व आनंदाने आस्वाद घेत असत. हाच गोपालकृष्णांचा व त्यांच्या सवंगड्यांचा गोपाळकाला होय. श्रीमद्भागवत व इतर ग्रंथांमध्ये या काल्याचे वर्णन आलेले आहे. हा काला सेवन करण्यासाठी स्वर्गातील देव देवता देखील उत्सुक असत. पंढरपूरचा पांडुरंग हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो, अनेक पुराणातील कथांमध्ये या पद्धतीने सांगितले गेले आहे, म्हणूनच पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्य दैवत मानणाऱ्या वारकरी संप्रदायामध्येदेखील श्रीकृष्णाच्या चरित्रातील विहित प्रसंगांना किर्तन आणि प्रवचनातून सादर केले जाते. वारकरी पंथांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या भागवत सप्ताहाच्या, पारायण सोहळ्याच्या तसेच पुण्यतिथीच्या उत्सवाच्या समाप्ती निमित्ताने काल्याचे कीर्तन करूनच त्या सोहळ्याचा सांगता समारंभ केला जातो. पंढरपूरची आषाढी व कार्तिकीची यात्रा हा वारकरी संप्रदायाचा महासोहळा, म्हणूनच या यात्रा सोहळ्याचादेखील समारोप पंढरपूरजवळ असणाऱ्या गोपाळपूर या ठिकाणी गोपाळकाला करून केला जातो. जे वारकरी आषाढी व कार्तिकीची वारी नियमितपणे करतात, ते केवळ एकादशी करून द्वादशीला आपल्या गावी परतत नाहीत, तर आषाढ व कार्तिकीच्या पौर्णिमेदिवशी गोपाळपूर या ठिकाणी होणाऱ्या गोपाळ काल्यामध्ये सहभागी होऊनच आपली वारी पूर्ण झाल्याचे समाधान करतात व नंतरच आपल्या गावी परततात. या गोपाळकाल्याचे वारकऱ्यांच्या दृष्टिने फार महत्त्व आहे.(क्रमशः)

- डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

history of pandharpur wari, dr. sachin lade, vitthal, rukmini, vitthaldarshan,

Post a Comment

0 Comments