नवीन

6/recent/ticker-posts

पानिपतच्या युद्धाची छाया आणि श्री गोविंद शिवराम खासगीवाले यांचे पंढरपुरातील लोकोत्तर कार्य - पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- १९) - डॉ सचिन वसंतराव लादे

पंढरीची अक्षर वारी - एका विरक्त योद्ध्याचा लोककल्याणकारी प्रवास - (भाग-१९)

panipat war & vari, history of pandharpur wari, part - 17, dr. sachin lade, vitthal, rukmini,  maharashtra, india, vitthaldarshan,

सन १७६१ मध्ये पानिपत या ठिकाणी मराठे व अब्दाली यांच्यामध्ये तिसरे युद्ध झाले, हे युद्ध पानिपतचे युद्ध म्हणून आपण ओळखतो. या युद्धामध्ये मराठ्यांचा दुर्दैवाने पराभव झाला, लाखो लोक मृत्यू पावले. मराठी साम्राज्याला या युद्धामुळे मोठा धक्का बसला तर अनेक रणवीरांना मानसिक धक्का बसला. युद्धातील संहार पाहून कित्येकांना वैराग्य प्राप्त झाले. खासगीवाले घराण्यांपैकी श्री गोविंद शिवराम खासगीवाले हे या युद्धातील संहार पाहून दुःखमग्न अवस्थेत पुण्यात परतले. पुण्यात आल्यानंतर त्यांचे संसारात मन रमेना, ते कायम उदास राहू लागले. त्यांची ही विरक्त मनोवृत्ती पाहून मराठी राज्यात समाविष्ट झालेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर याठिकाणी थोरले माधवराव पेशवे यांनी त्यांची नियुक्ती पंढरपूरचे कमाविसदार म्हणून केली. ते मोठ्या आनंदाने पंढरपुरात आले व त्यांनी आपले उदास मन विठ्ठलभक्तीकडे वळविले. विठ्ठलाची भक्ती करत करत त्यांनी पंढरपूरचा मुलकी कारभार सांभाळायला सुरवात केली. त्यांनी विठ्ठल मंदिराची व्यवस्था, यात्रेकरूंची व्यवस्था व पंढरपूरचा विकास याकडे लक्ष दिले. हा कारभार करत असताना त्यांना पंढरपूर हे आता वारकऱ्यांच्या सोयीसाठी लहान पडत असल्याचे लक्षात आले व त्यांनी सध्या असणारा सरकारी दवाखाना व त्याच्या दक्षिणेचा भाग व त्याच्या उत्तरेचा भाग यामध्ये असणारी मोठी घळ बुजविली व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त असे मोठे गटार बांधले. पंढरपूर गावातून पलीकडे जाण्यासाठी या बंदिस्त गटारावर पूल बांधला व या बंदिस्त गटारीच्या पलीकडे गोविंदपुरा ही नवीन वसाहत स्थापन केली, त्यामुळे आषाढी कार्तिकीवारी साठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची तेथे सोय होऊ लागली. अशा प्रकारे श्री गोविंद शिवराम खासगीवाले यांनी पंढरपूरच्या विकासात भर टाकली.

श्री गोविंद शिवराम खासगीवाले यांनी लक्ष द्यायला सुरुवात केल्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढत चालली, विशेषत: आषाढी व कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालली व या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घडेना, हे लक्षात घेऊन श्री गोविंद खासगीवाले यांनी पेशवे यांच्या परवानगीने पंढरपुरात बंद पडलेली रथयात्रा पुन्हा सुरू केली. सन १७६१ मध्ये पहिल्यांदा ही रथयात्रा नव्याने काढण्यात आली. ज्या भाविकांना एकादशीचे दर्शन घडत नसेल त्यांना या रथातील पांडुरंगाचे दर्शन घडू लागले, रथयात्रा काढण्याचा हाच खरा मुख्य उद्देश होता. भक्त माझे पर्यंत येऊ शकत नसतील तर मीच भक्तांपर्यंत जाईन ही पांडुरंगाची इच्छा जाणूनच श्री खाजगीवाले यांनी ही रथयात्रा पुन्हा सुरू केली. या रथासाठी लागणारा खर्च खाजगीवाले यांनी स्वतः केला व एक मोठा लाकडी रथ बांधला. ही रथयात्रा सुरू करण्यासाठी पेशवे यांनी केवळ परवानगीच दिली असे नाही तर त्यांनी मदत देखील केली. सन१७६१ मध्ये सुरू झालेली ही रथयात्रा आज पर्यंत अखंडपणे सुरू आहे. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी या दिवशी आजही ही रथयात्रा पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरून निघते.(क्रमशः)

- डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

history of pandharpur wari, dr. sachin lade, vitthal, rukmini, vitthaldarshan,

Post a Comment

0 Comments